Monday, December 1, 2014

धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं...


धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं. सगळेजण म्हणतात भजी आणि चहा पाहिजे. लोक म्हणतात चांगली गाणी लावा. मग गाणी लावली की पब्लिक पाउस आहे म्हणून शांत गाणी लावा म्हणते. शांत गाणी बरेचदा उदास असतात. गझल फिजल. गझली हा प्रकारच उध्वस्त. संस्कृतात सगळीकडे सज्जन, दुर्जन , चंदन, गुलाब तर उर्दूत सगळ्यांचे प्रेमभंग आणि दारु. पावसात, चिकचिकीत कुठे जायचा कंटाळा येतो म्हणून नखरे सुचतात असले. प्रेम, देशभक्ती आणि थेअरी ऑफ रेलेटिव्हिटी हे पूर्णपणे कळाले आहेत का कुणाला? मागचे लिहिले तेवढे सेंटी वाक्य मी लिहीले आहे याच्यावर विश्वासच बसत नाहिये. प्रेम म्हणजे किल-बिल मधले बिल आणि बेट्रिक्सचे प्रेम, तेच खरे. देशभक्ती म्हणजे, मागच्याच्या मागच्या वाक्यात देशभक्ती शब्द टाकायलाच नको होता, उदाहरण आठवत नाही लगेच. लाईफमधे फंडे क्लिअर असणे फार महत्वाचे आहे. फंडे योग्य असोत किंवा अयोग्य, ते क्लिअर असणे महत्वाचे आहे. आपण बरोबर आहोत का चूक ते माहित असणेपण महत्वाचे आहे. बिलचे फंडे क्लिअर आहेत एकदम. तो म्हणतो - "बॅट्मॅन हा मूळात ब्रुस वेन आहे, स्पायडरमॅन हा मूळात पीटर पार्कर आहे. पार्कर, वेन यांना वेश चढवून स्पायडरमॅन, बॅटमॅन बनायला लागते. पण सुपरमॅन हा मूळातच सुपरमॅन आहे, त्याला वेश बदलून क्लॉर्क केंट बनायला लागते. हा महत्वाचा फरक आहे. तशी तू मूळातच नैसर्गिक असॅसीन आहेस..." आपल्या छोट्याश्या पोरीलापण मृत्यू समजावून ठेवला आहे बिलने. तडफडणारा मासा दाखवून. कंपनीमधे मलिक म्हणतो, "मैं चंदू नही हूं", श्रीनिवासन नंतर म्हणतो, "मैं भी चंदू नही हूं". हे सगळे असंबध्द आहे पण फंडे असे क्लिअर पाहिजेत माणसाचे. मातीचा वास वगैरेपण येतो पाउस पडल्यावर. त्याचा परफ्यूम काढायला पाहिजे, लय पैसा मिळेल. पाउस पडतोय बेक्कार, एक जोडी गाडीवरून जाताना दाखवायची - टेबल लॅंडटाईप कुठेतरी. स्म्म्म्म करुन श्वास घेवून, मातीचा वास मला आवडतो म्हणणार हिरॉईन. मग हीरो आयलव्हयू म्हणणार, समोर लगेच आपला परफ्यूम. मुलगी, जिंगल आणि परफ्यूमचा आकार योग्य असेल तर चालेल परफ्यूम. असेलच असा एखादा परफ्यूम बाजारात. पाणी बिळात भरते पावसाळ्यात म्हणून साप बाहेर येउन फिरत बसायचे चिपळूणला. इतकी वर्ष पाउस पडतोय, इतकी वर्षे बिळे बनतायत, सापांनी काहीतरी विचार केला असेल का? का अजुनपण चारपाच साप बुडुन मरतात? पुस्तकांचा वासपण आवडतो लोकांना. नवीन पुस्तकांचा चांगला येतो. किंडल ई बूक रिडर घेतला तर तो वास येणार नाही. किंडलच्या प्लॅस्टिकचा वास आवडेल की नंतर. रेनकोट आणि छत्र्या पण येतात लगेच. काय अर्थ आहे वर्षानुवर्षे छत्र्या, रेनकोट वापरण्याला? स्व-रुप पहा विश्वरुप नको, असा एक धडा होता विनोबांचा. त्यात एक राजपुत्र आणि राजा उन्हातून जात असतात. राजपुत्र म्हणतो चटके बसत आहेत पायाला, चामडे अंथरुया सगळ्या राज्यात जमिनीवर. राजा म्हणतो वेड्या त्यापेक्षा तु तुझ्या पायात चपला घाल. स्व-रुप पहा. राजपुत्र जे म्हणाला तेच जर एडिसन, आईनस्टाईन किंवा गांधीजी म्हणाले असते तर. त्याच धड्यात होते का हे? पावसाळ्यात सर्दी होते लगेच लोकांना. सर्दीचे एक आहे, कुठल्याही ऋतुमधे पन्नास टक्के लोकांना गाठतेच ती. इतके वर्षे सर्दी होत आहे माणसाला. कुत्रीपण शिंकतात कधी कधी. इतकी प्रगती झाली, एक साधी गोळी नसावी की जी घेतल्या घेतल्या घसा खवखवायचा बंद होईल, सर्दी जाईल पाचेक मिनीटांत. काहीपण घ्या ३-४ दिवस असतेच. पाउस बरा असतो, पिकांना पाणी , पोरांना होड्या etc. पावसाला लाच द्या. बेईमानी का धंदापण ईमानदारीत नाही. पैसा झाला खोटा ! * हे लिहायची काही गरज नव्हती खरे तर. नाव योग्य आहे ब्लॉगचे.

स्वभाव कधी बदलतो का?


स्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून घेतो. प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या स्वभावात अगदी सारखी असते ती म्हणजे आपल्याला आपले कौतूक केलेले खूप आवडते. दोन वर्षाच्या चिंगी पासून तर ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत. चिंगी, “तुझे बुटू किती छान आहेत गं “ , किंवा “तू किती सुंदर आहेस गं”.. म्हटले की चिंगी खूष होते,तसेच एखाद्या ८०वर्षाच्या आजोबांना तुमची तब्येत खूप छान आहे हो असे म्हंटले की ते खूश होतात.. थोडक्यात काय तर प्रत्येकालाच आपले कौतूक केलेले आवडते. आपले जे वागतो ते पण बरेचदा केवळ इतरांनी आपले कौतूक करावे , आपल्याला चांगले म्हणावे म्हणूनच असते . बायकोने स्वयंपाक केल्यावर ” छान झाली आहे भाजी” असे म्ह्टले की तिला भरून पावते, त्या पेक्षा जास्त तिची अपेक्षा पण नसते. ऑफिस मधे एखादे काम केल्यावर बॉस ने दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सुखावून जाते .जर कोणी कौतुक करणारे नसेल तर काय फायदा हो कामं करण्याचा? कौतूक बरेचदा आपल्याला इतरांकडून हवे असते. आपल्या लोकांकडून नाही. नाही पटत?? उदाहरणार्थ घरात कळकट गाऊन घालून दिवसभर बसणाऱ्या बायका तयार होतात ते केवळ बाहेर निघतांना, कौतुकाची नजर हवी असते ती बाहेरच्या लोकांकडून नवऱ्याकडून नाही, आता काही स्त्रिया म्हणतील, की नवऱ्याच्या कौतुकाच्या नजरेत स्वार्थ दिसतो :) असो.. विषयांतर होतंय. मी हे लिहितोय म्हणजे मी पण काही वेगळा नाही. मला पण कौतूक खूप आवडते. मग ते अरे बारीक झालास रे थोडा. असे जरी कोणी म्ह्टले तरी मला आनंद होतो. ब्लॉग वर पण काही तरी लिहिल्यावर कौतूक व्हावे असे वाटत असतेच, किंबहूना मी लिहितो ते पण केवळ माझे कोणी तरी कौतूक करावे म्हणूनच! केवळ याच कारणासाठी आपण काही लिहिले की ब्लॉग ची लिंक मी चार – दोन गृप मधे आणि स्वतःच्या भिंतीवर लटकवत, सोबतच ही जाहिरात नाही हे बिरुद चिकटवायला पण कमी करत नाही जर एखाद्या व्यक्तिने आपल्या लेखाचे अपेक्षे प्रमाणे कौतूक केले नाही की मग थोडी चाहूल घेतो, की ह्याने लेख वाचला की नाही आपला? नाही असे वाटले तर लिंक मेल करतो. नंतर तरीही त्याची रिऍक्शन आली नाही तर फोन करून विचारतो , ” की काय रे लेख वाचला की नाही?” बरेचदा तर मित्रांच्या पोस्ट वर आपल्या लेखाची लिंक पोस्ट करून इतरांच्या फेसबुक भिंती रंगवण्याचे कामही मी कधी कधी करत असतो. आपण लिहिलेला एखादा जुना लेख आपल्यालाच खूप आवडलेला असतो, पण त्या लेखाचे फारसे कौतूक झालेले नसते, किंवा कोणी “लेख जमलाय बरं का” असेही फारसे म्हटले नसते, तोच लेख पुन्हा पुन्हा फेसबुक मधे मित्रांच्या भिंतीवर चिकटवून खरंच लेख जमलाय की नाही याची चाहूल घेण्यासाठी नाही तर कौतूक करून घेण्यासाठी पोस्ट करतो मी बरेचदा. म्हणजे काय, कौतूक व्हावे म्हणून लिहितो मी. आत्म समाधान किंवा मला वाटतं म्हणून मी “काय वाटेल ते “लिहिले असते, तर कौतुकाची अपेक्षा केली असती का? एखादा लेख कोणी वाचला नसेल तर ” अरे माझा तो लेख वाचलास की नाही?” असे विचारून त्याने वाचे पर्यंत पाठपुरावा म्हणजे माझा लेख वाच आणि माझे कौतूक कर, छान झालाय म्हण” ही आंतरिक इच्छा लपवून …………….! किती दांभिक पणा नाही का ? हे आयुष्य आहे ते आपण जगतोय ते केवळ पाठीवरच्या कौतुकाच्या थापे साठी! लहान मुल जेंव्हा स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभे रहाते, तेंव्हा आई नजरेतले कौतुक त्याला नक्कीच समजते. शाळेत सरांनी केलेले सुंदर हस्ताक्षरा बद्दलचे कौतूक , एखाद्या मैत्रिणीने अरे वा.. मस्त आफ्टर शेव्ह आहे रे म्हणून केलेले कौतूक, नवीन बाईक घेतल्यावर नाक्यावर बाईक घेऊन गेल्यावर मित्रांनी केलेले बाईकचे कौतूक, लग्न झाल्यावर बायको सोबत बाहेर निघाल्यावर नातेवाईकांनी/ मित्रांनी बायकोचे केलेले कौतूक, मुलीचे इंजिनिअरींग पुर्ण झाल्यावर जसे काही आपणच काही तरी मिळवले आहे असे समजून स्वतःचे करून घेतलेले कौतूक…. असे अनंत प्रकार आहे. शेवटी काय तर ह्या आयुष्याचा सगळा पायाच ह्या कौतुकावर अवलंबून आहे. लेख लिहिलाय बरेच दिवसापूर्वी पण पण पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. आज सहज ड्राफ्ट चेक केले तर

कशी मुलगी पाहिजे?


कशी मुलगी पाहिजे? तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे. उत्तर तितकंच अवघड. हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं. म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं, "असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे." पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात), सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या थोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी, ई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'! जवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको कॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या मावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात जाऊन म्हणायचं, "घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण झाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे!" ~"मिळेल हो, नक्की मिळेल!" असा आशीर्वाद हमखास मिळतोच! मित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे बदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC किंवा BC शीच करायचं असतं. 'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न, किंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा 'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन! चुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की, "अरे! जमिनीवर उतर! स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात? अरे, त्या फक्त सिनेमात असतात. खरं आयुष्य खूप वेगळं असतं!" सगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते. कशी मुलगी पाहिजे? तिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं. मित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात. मग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते. मग स्वत:हूनच सांगते, 'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु) किंवा 'अरे! अगदी अप्सरा आहे! ऐश्वर्याच!' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत सलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो) म्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही!! :-((( अप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का? Can I not have best of both the worlds? आम्हाला कशी मुलगी पाहिजे? 1) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची? ह्या करता "हीथ्रो टेस्ट" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली. तर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो, किंवा झुमरीतलैय्या मधे! तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे! म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला मुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि independent पाहिजे. २) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी चालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा बुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा मारता आल्या पाहिजेत! ३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज, आणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि आकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे! म्हणजे काय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या बालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे, त्याला आम्ही तरी काय करणार? ४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. "चंपक / चांदोबा" आणि "डॉक्टर कोतनीस की अमर कहानी" हे उत्तर पण चालेल! अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात नाही तसाच तो जेन ऑस्टेनचा "मिस्टर डार्सी" आणि शाहरुखचा "राहुल" फक्त पुस्तकात किंवा सिनेमा विश्वातच सापडतो हो! ५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे - तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच! खेळता येत असतील तर absolutely nothing like it! ६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या तुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी म्हणतात ना, "nothing else, but an honest intent matters". ७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला येत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर आमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे. ८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान , गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे. अधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं!) ९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या खोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर जिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं, नाहीतर "काय ही रद्दी जमा केली आहे" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही. १०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्त "हास्य" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+' पाहिजे. चला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला बरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या "अप्सरा + बायको" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी माहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल. तो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो, धागे तोड लाओ चांदनी से नूर के, घुंघट ही बना लो रौशनी से नूर के, शर्म आ गयी तो आघोष में लो, हो सांसों से उलझी रहें मेरी सांसें, बोल ना हलके, हलके बोल ना हलके, हलके...!!!!!!!!!!!!!!

वाढदिवशी आनंदीच रहायला हवं हा नियम असूनही मोठय़ानं भोकाड पसरावं असं का वाटतंय मला.?


वाढदिवशी आनंदीच रहायला हवं हा नियम असूनही मोठय़ानं भोकाड पसरावं असं का वाटतंय मला.? रात्री बाराच्या ठोक्याला मेसेजेस.संध्याकाळी भेटणारच सगळे. ते माझ्यासाठी ब्लॅकफॉरेस्ट आणणार, मेहुल एक पार्कर देईल. सानिका हॅपी बर्थडे लिहिलेला मग देईल. चुकून राहून गेलेलं प्राईस टॅग सगळ्यांसमोर काढत निमिष रिस्ट वॉच देईन, वर्षा एक डेअरी मिल्क देईल. मुलींवाला एक लूक थ्रो करत म्हणेल ‘किती महाग गिफ्ट देतोय त्यापेक्षा किती मनापासून देतोय, दॅट मॅटर्स.’मग मॅकडी मधे हॅपी बर्थडे टू यू.हे सगळं असंच होतं!पण हे मला का माहितीये.?हे तर सरप्राईज आहे.मी ‘सरप्राईज’ने चकीत व्हायलाच हवं. इट्स माय बर्थ डे टुडे. मी खूप एक्साईटेड नसलो तरी ‘अरे माझ्या लक्षातच राहत नाही माझाच वाढदिवस’ असं माझं काही नाहीये. माझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस आणि तुषार, मह्या, अवि, सानिका, मेहुल, वर्षा, स्वाती, निमिष, तन्वीर, फैजल याही सगळ्यांच्या लक्षात आहे. फेसबुक यायच्या आधीपासून. म्हणजे मी विसरलो नाहीये, इतकंच. आणि तेही विसरले नाहीयेत. रात्री बाराच्या ठोक्याला यातल्या तिघींचे एकाच वेळी मेसेजस आले मला..‘सो, आय विश यू फस्ट राईट?’ मी ‘येस ऑफकोर्स.थॅँक्स’ असा रिप्लाय केला, तिघींनाही. आणि आता दुपारी बारालाही माझा व्हाट्सअपचा मेसेंजर दर पंधरा-वीस मिनिटांनी खणखणतोय. पण तरीही तो बंद करून ठेवावासा नाही वाटत. मग चार-पाच फोन आणि दोन-तीन व्हच्यरुअल ग्रीटिंग काडर्स. आता उठायला हवंय. संध्याकाळी भेटणार आहोत सगळे. ते माझ्यासाठी ब्लॅकफॉरेस्ट आणणार मॉन्जिनिसमधून. मेहुल एक पार्कर देईल. सानिका हॅपी बर्थडे लिहिलेला मग देईल. निमिष रिस्ट वॉच देईन, चुकून राहून गेलेलं प्राईस टॅग सगळ्यांसमोर काढत. वर्षा एक डेअरी मिल्क देईल. आणि निमिषकडे एक मुलींवाला लूक थ्रो करत म्हणेल ‘किती महाग गिफ्ट देतोय त्यापेक्षा किती मनापासून देतोय, दॅट मॅटर्स.’ मग मॅकडीमध्ये हॅपी बर्थडे टू यू ची ट्यून वाजेल साडेसात सेकंद आणि एक अख्खा मिनिट मी केकने माखलेला स्वत:चा चेहरा उगाच वॉशरूमच्या आरशात न्याहाळत बसेन. पण मला आता यातलं काहीच माहीत असायला नको, म्हणजे ते मला एक प्लिझण्ट सरप्राईज असेल. असावं. हे सारं असंच होतं, होणार हे माहीत असूनही मी ‘सरप्राईज’ने खूश व्हायला पाहिजे. खोलीचं दार उघडून मी बाहेर येतो. दुधाचं भांडं उघडंच राहून गेलंय. राकेशला आज मॉर्निंग शिफ्ट. त्यामुळे तो सातलाच बाहेर पडला असणार. पार्थ आजही केर बाहेर ठेवायला विसरलाय. ‘सॉरी भाई, वॉज इन हरी, हॅपी बर्थडे, एन्जॉय यूवर डे. ओट्यावर खरडून ठेवलेलं खडूने मध्यभागी. जीव खाऊन तीनदा खसाखसा पुसून काढला ओटा तरी पुसट पांढर्या रेषा दिसत राहिल्याच. अंथरूणावर अस्ताव्यस्त पसरलेली सिगरेटची थोटकी तशीच राहू देत.अनुषा भयंकर कातावते हे पाहून. ‘व्हाय यू गाईज हॅव टू बी सो प्राऊड पिग्ज?’ पण आता तीसुद्धा बंगळुरुलाय. भल्या पहाटे आठला तिचा फोन आला. ‘हाय बेबी, हॅपी बर्थडे! लव्ह यू.मुआऽऽ.’ हेच दोन-तीनदा क्रम बदलून म्हटलं तिने आणि फोन ठेवून दिला. नवाकोरा जॉब आहे त्यामुळे जरा एक्साईटेड असेल असं स्वत:ला समजावत मी पाकिटातली शेवटची सिगरेट शिलगावतोय. खिडकीतून एक छोटासा कवडसा आत शिरून बसलाय. त्या कवडशात मला माझा इवला धूर खोलीभर उंच आणि मोठ्ठा वाटतोय. त्याच्याकडे एकटक वगैरे बघत बसायचं मी फक्त! चिडचिड नाही करायची आजच्या दिवशी असं मी दरवर्षी ठरवतो. बट आय फिल इरिटेड यार! कालचा दिवसच आजही आहे आणि तोच उद्याही असणारे. तरीही याच दिवशी फेसबुकवर नको जायला, फोन नको उचलायला, खोलीतून बाहेर नको यायला, अंघोळ नको करायला, संध्याकाळी बाहेर नको जायला असं सगळं एकदम, एकाच वेळी खूप तीव्रतेने का वाटत असतं? अशाच वेळी नेमकी पाकिटात एकच सिगरेट का शिल्लक राहते? आणि मग एक तरी का राहते? जुलैमध्ये एकही सुट्टी का नसते? तरीही जुलैमध्येच का येतो माझा बर्थडे? दिवाळीत, ख्रिसमसला, गणपतीत, आंब्याच्या सीझनमध्ये, २९ फेब्रुवारीला असा का येत नाही? मला आई कधीच चॉकलेटस् का द्यायची नाही वाटायला शाळेत? ‘टीचर इट्स माय बर्थडे टुडे’ असं सांगूनही टीचर बाहेर उभं का करायच्या? ‘तू ओरडत जा ना त्यांना’ असं आईला सांगायचं ठरवून घरी येताच बेल वाजवल्यावर आजही आमच्या मावशीच का दार उघडायच्या? आजसुद्धा त्या माझ्यासमोर बोर्नव्हिटाचाच मग आदळायच्या ‘लवकर लवकर पी’ असं खेकसतच. आणि मुख्य म्हणजे आठव्या वाढदिवसाला पहिल्यांदा पडलेले हे प्रश्न पंचविसाव्या वाढदिवसापर्यंत छळत आलेत सतत चढत्या भाजणीत? पार्थने एव्हाना पार्कर घेतला असेल. ब्लॅकफॉरेस्टवर माझं नाव पेस्ट्रीफाय होत असेल. माझ्यासाठी म्हणून सगळे सरप्राईज प्लॅन करताहेत. पण अशा कशानेही मला सरप्राईज होताच येणार नाहीये याचा आज मला माझ्या वाढदिवशी चार वाजून छप्पन्नाव्या मिनिटाला अतोनात त्रास होतोय. निदान हे बघायला तरी कोणीतरी असायला हवं होतं इथे. हे सगळं असं घडायलाच नको होतं.... पण घडतं असंच, माहित असलेल्या सरप्राईजसारखं.ते सरप्राईज काय हे माहिती आहे, तरीही या ‘आय विश’ खेळाचा मोह आवरता येत नाहीये.

"वपुर्झा" न वाचलेला साहित्यप्रेमी विरळाच


श्री. व.पु. काळे यांचे कथाकथन न ऐकलेला, "वपुर्झा" न वाचलेला साहित्यप्रेमी विरळाच ! आज आपल्यासाठी "वपुर्झा " मधील काही उतारे देत आहे. आपल्या मनातील विविध विषयांवरील विचार जसे आहेत तसे, उगाच कसलाही मुलामा न देता व्यक्त केले आहेत वपुर्झा मध्ये. हा थेटपणा, हा खरेपणा, हा सरळपणा हेच वपुर्झाचे वेगळेपण ! आपले विचार व्यक्त करण्यासाठी आजकाल आपण "ब्लॉग " वापरतो पण व.पु.नी "वपुर्झा" द्वारे फार पूर्वीच ही कल्पना हाताळली होती असे वाटते मला, फक्त त्यावेळी इंटरनेट नव्हते म्हणून !!! ------------------------------------------------------------------------------------------------ "माणसाला काही न काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वत:ला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे " हरवणं-सापडणं " प्रत्येकाचं निराळं असतं. पती-पत्नीचं एकंच एक मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पती-पत्नीच्या ह्या हरवण्याच्या-सापडण्याच्या जागा एकाच निघाल्या तर ते सुख-दुखा:चे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्नं वेगवेगळी असतील, तर प्रकृतीधर्मानुसार ते स्वाभाविक आहे, पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल, त्यांना संसारसुखाचं मर्म सापडलं. ज्यांना हे असं हरवता येत नाही, ते रिकाम्या वेळेचे बळी ठरतात. रिकामा वेळ सैतानाचाच." ------------------------------------------------------------------------------------------------ अक्षता ह्या शब्दातलं प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. अ = अर्पणभाव क्ष = क्षमाशीलता ता = तारतम्य हे तीन गुण दोघांजवळ हवेत. प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या उतरवाव्यात. एकमेकांच्या वृत्तीचा खरा मागोवा घ्यावा. सप्तकातले किती सूर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासावं. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालू शकणार आहोत त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली कि साप तिकडे वळूनही पाहत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो, त्याचं संशोधनचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्याला अर्पणभाव म्हणतात. स्वत:तल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे, दोष समजले आहेत, कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तीदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती म्हणजे क्षमाशीलता. तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाकवायला लावायचं, स्थळ, काल, स्थिती यांचं भान म्हणजे तारतम्य. " ------------------------------------------------------------------------------------------------ " आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुखा:चे कढ आणि आवर घातलेले आवेग-हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला. "

कार्पोरेट ट्रेनिंग


हल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान ऐकलेल्या काही गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. तर अशीच ही एक गोष्ट, मला आवडलेली आणि लक्षात राहिलेली , तशी ही गोष्ट सांगितल्या गेली होती वेगळ्याच संदर्भात, पण मला मात्र लक्षात राहिली ती वेगळ्याच संदर्भात .जपान मधे सुशी नावाचा एक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे असे. हा पदार्थ बनवण्यासाठी एकदम ताजे फडफडीत मासे वापरले जातात. कच्चे मासे असल्याने, ते अगदी ताजे असणे महत्त्वाचे असते. प्रत्येक बोटीवर पकडलेले मासे ठेवण्यासाठी एक जागा असते. मासेमारी साठी जातांना त्या रिकाम्या जागेत बर्फ भरून नेला जातो आणि त्या बर्फात ठेऊन मासे आणले तर तर मासे डिकंपोझ होत नाहीत, म्हणून बर्फात ठेऊन आणण्याची पद्धत आहे. तर एका जपानी कोळ्य़ाने आपला सेल वाढवण्यासाठी एक युक्ती केली. समुद्रावर जातांना इतर कोळी बर्फाच्या लाद्या भरून न्यायचे त्याने तीच जागा मॉडीफाय करून त्या जागी पाणी भरून त्या पाण्यामध्ये पकडलेले मासे ठेऊन आणणे सुरु केले. माशांना पुरेशी हवा मिळावी म्हणून ती पण सोय केली. समुद्र किनाऱ्यावर पोहोचे पर्यंत ते सगळे मासे अगदी संथ पणे पडून रहायचे पाण्यात पण जिवंत रहायचे. जिवंत माशांना नक्कीच जास्त पैसे मिळायचे . पण….. एका पंचतारांकित हॉटेल मधल्या शेफ ने कम्प्लेंट केली या माशांची चव काही फार चांगली लागत नाही. मासे जरी जिवंत असले तरीही ते मेल्यातच जमा आहेत. अजिबात काही अॅक्टिव्हिटी नाही , काही नाही त्या मुळे त्यांच्या जिवंत पणाला पण काही अर्थ नाही. सुशी मधे काही खास चांगली चव लागत नाही या माशांची! त्या कोळ्य़ाच्या मनात विचार आला की आता काय करावं? त्याने एक नवीन युक्ती शोधून काढली, मासे पकडल्यावर त्याने त्या माशांच्या टाकी मधे एक बेबी शार्क पण टाकला. त्या शार्क ने आपल्या सवयी प्रमाणे त्या टाकी मधे पण इकडून तिकडे पोहोणे आणि मासे खाणे सुरु केले, आणि त्या बरोबर टाकी मधल्या माशां मधे हालचाल सुरु झाली, ते इकडून तिकडे पोहायला लागले, आणि खूप अॅक्टिव्ह झाले. बेबी शार्क ने काही मासे जरी खाल्ले तरी पण समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर जे मासे होते बोटी मधे शिल्लक होते ते एकदम अॅक्टीव्ह , अगदी ’फुल ऑफ लाइफ” होते, आणि ते अगदी त्या पंचतारांकित हॉटेल ला हव्या असलेल्या क्वॉलिटी चे होते. कोळ्याला पण खूप चांगला भाव मिळाल्या त्याच्या माशांना. झालं संपली गोष्ट! मॉरल ऑफ द स्टॊरी :- एक शार्क त्या पाण्याच्या टाकीत सोडल्याबरोबर सगळे मासे अॅक्टिव्ह झाले आजकालच्या कार्पोरेट लाइफ मधे पण असंच सुरु असतं नाही का? . कुठलीही कंपनी घ्या, शार्क च्या जागी “एच आर”, आणि माशांच्या जागी इतर एम्प्लॉइ कन्सिडर करा- आणि हो, तो शेफ म्हणजे मॅनेजमेंट बरं का. आणि पुन्हा एकदा वर लिहिलेली कथा वाचून काढा-

कोल्हापूर.... कार्यकर्त्यांची जडणघडण करणारी तालीम


गल्लीत एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत. अजूनही खादीचे कपडे वापरून आपली राष्ट्रभक्ती व्यक्त करतात. गल्लीत एक वायुसेनेतील निवृत्त अधिकारीही आहेत... वास्तविक गल्लीतल्या गणेशोत्सवात या दोघांना आरतीचा मान देणे आपले कर्तव्यच आहे; पण तसे नाही, गणेशोत्सवाच्या आरतीचे नियमच ठरले आहेत. ज्याने वर्गणीसाठी पाच हजार रुपयांची पावती फाडली, त्यालाच आरतीचा मान आहे आणि अर्थातच हा मान एक जुगारअड्डा चालक, एक मटकेवाला, एक खासगी सावकार, एक जागेचा दलाल यांना मिळाला आहे. कारण प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये वर्गणी देण्याची ऐपत फक्त त्यांच्यातच आहे. गणेशोत्सवाची आरती हे केवळ एक उदाहरण आहे; पण कोल्हापुरातील बहुतेक सार्वजनिक मंडळे, तालमींना सध्या या दोन नंबरवाल्यांच्या पैशाची ताकद मिळाली आहे आणि अशी आर्थिक ताकद वापरून त्यांनी इथल्या सार्वजनिक क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. पाचगावच्या घटनेनंतर सीपीआर परिसरात झालेल्या गर्दीवर एक नजर टाकली तर त्यात पाचगावचे अशोक पाटीलप्रेमी ग्रामस्थ जरूर होते; पण ते सोडून अनेक जण मर्डर, हाफ मर्डर, दंगल, दहशत, मटका, सावकारी क्षेत्रातले होते. ते तेथे का आले होते, हे महत्त्वाचे आहे आणि पोलिसांच्या कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरणही झाले आहे. या लोकांनी आपले समर्थक गावागावांत, मंडळामंडळांत, तालमीतालमींत कसे पेरले आहेत, हेच त्यातून स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानाची भाषा वारंवार वापरणाऱ्या कोल्हापुरातले हे चित्र निश्चितच गंभीर आहे. पुढची महापालिका, विधानसभा निवडणूक कोणत्या पातळीवर जाऊन पोचलेली असेल, त्याची एक झलकच त्यातून दिसून गेली आहे. कोल्हापुरात मान कार्यकर्त्याला की गुंडाला, याचा एकदा सर्व पातळीवर विचार करण्याची गरज त्यातून अधिक गडद झाली आहे. कोल्हापूर ही कार्यकर्त्यांची जडणघडण करणारी तालीम मानली जाते. तशी परिस्थितीही आहे; पण कार्यकर्त्यांपेक्षा वरचढ ठरलेल्या काळेधंदेवाल्यांनी कळत नकळत सार्वजनिक कार्यक्रमांचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. गणपतीची आरती मटकेवाला, महाप्रसाद वाटप दारूवाला, मोहरमचा नारळ फोडायला खासगी सावकार, नवरात्राची पूजा करायला जुगारवाला हे काही मंडळांचे निकषच ठरले आहेत. ते हजाराच्या पटीत वर्गणी देतात म्हणून त्यांना हा मान द्यायचा, हे जणू ठरूनच गेले आहे. हे चित्र भविष्यात अधिक विदारक होणार आहे. हजार, दहा हजारांत एखादे मंडळ "गळाला' लागणार असेल, तर ही काळेधंदेवाली मंडळी आपल्या थैल्या उघडून बसणारच आहेत आणि मंडळ, तालीम बाजूला राहू दे; आपला कोल्हापूरचा स्वाभिमानच ते या काळ्या पैशाच्या बळावर भुसभुशीत करणार आहेत. पाचगावच्या घटनेनंतर "सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा वैरी' असे फलक त्यामुळेच लागले आहेत. पाचगावची घटना एखाद्याचा निर्घृण खून झाला म्हणून निश्चित वाईट आहे; पण कोल्हापूरच्या काही मंडळांवर, काही तालमींना काळ्या पैशाचे कसे वरदान होते, यावर प्रकाशझोत टाकून गेली आहे.