फिनिक्स’
एका माणसाने किती आपत्तींचा सामना कारावा? नागपूरला मेडिकल कॉलेजला हिंमतराव बावस्कर जेव्हा प्रथम वर्षाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाला तेव्हा अतिशय अभ्यासू मुलगा म्हणून आम्ही सिनीअर्स त्याचं कौतुक करायचो. त्याला शरीरशास्त्रावरील ग्रे चे पुस्तक तोंडपाठ आहे, असे बोलले जायचे. नंतर त्यामागची व्यथा कळली. गरीब घरातून आलेल्या व प्रसंगी रोजगार हमीवर मजुरी करून शिक्षण घेतलेल्या हिंमतरावने ‘आपण मेडिकलला नापास होऊ’ या भीतीपायी मेडिकलला येण्यापूर्वी सुटीत पुस्तक पाठ करून टाकले होते. मानसिक रोगाच्या दुर्दैवी झटक्यामुळे त्याचे शिक्षण खंडित झाले तेव्हा हा होतकरू मुलगा डॉक्टर म्हणून कायमचा संपला की काय, अशी आशंका वाटली. पण गरिबी, रोग, सरकारी नोकरीचा खाक्या, पोस्ट ग्रॅज्युएशनमधील वरिष्ठांनी केलेली अडवणूक या सर्वांमधून पार पडून फिनिक्स पक्ष्यासारखा तो परत उभा राहिला. महाडसारख्या छोट्या गावात खासगी प्रॅक्टिस करत त्याने आपली वैज्ञानिक निरीक्षणे, विचारशक्ती, प्रयत्न आणि प्रेरणा यांच्या भरवशावर कोकणामधील प्राणघातक विंचूदंशावर विकसित केलेली उपचारपद्धती अगदी अफलातून होती. पुराव्यासकट त्याने ती जागतिक वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केली व दुर्गम भागातील अंधारात एकाकी काम करणारा हिंमतराव प्रकाशात आला.
हिंमतरावमध्ये समाजातील वैद्यकीय प्रश्न बघू शकण्याची व ते सोडवू शकण्याची प्रतिभा आहे. प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांमध्ये फार क्वचितच आढळणारी वैज्ञानिक प्रयोग करण्याची व ते प्रकाशित करण्याची क्षमता व जिद्द आहे. सोबतच याचा फायदा रुग्णांना - विशेषत: गरिबांना मिळावा यासाठी धडपड आहे. आपल्या तत्त्वांसाठी किंमत चुकवण्याची तयारीही आहे. जीवनात उपसावे लागलेले कष्ट व अडवणुकीमुळे त्याच्या स्वभावात व भाषेत एक तिखट कटुतेची छटा आहे. आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते, ही त्याच्या मनातली वेदना आहे. ‘लोकमत’च्या या सन्मानामुळे हिंमतरावची व्यथा दूर होईल. ग्रामीण, गरीब महाराष्ट्रातून असा वैज्ञानिक डॉक्टर आयडॉल निघावा, ही महाराष्ट्रासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. डॉ. हिंमतराव बावस्कर व त्यांना कायम साथ देणार्या त्यांच्या पत्नीचे या सन्मानासाठी मन:पूर्वक अभिनंदन.
- डॉ. अभय बंग
(आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, सामाजिक कार्यकर्ते)
लढवय्या
राजू शेट्टी आणि लढाऊ बाणा हे समीकरणच आहे. राजू शेट्टी हा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कायम आघाडीवर राहून लढणारा नेता आहे. पाठ फिरवणं हा त्यांचा स्वभावच नाही. मुख्य म्हणजे कोणतीही अनुकूलता नसताना सर्वच गोष्टी स्वबळावर त्यांनी मिळविल्या आहेत.
सातत्य हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. कोणताही प्रश्न असो, नाहीतर मुद्दा, तो धसास लावल्याशिवाय सोडायचा नाही, त्याचा पिच्छा पुरवत राहायचा आणि तो सोडवल्यावरच निवांत श्वास घ्यायचा. यामुळे माणसंही त्यांच्या मागे उभी राहतात. कार्यकर्ते जोडले जातात.
अत्यंत कष्टाळू असा हा नेता आहे. अविरत कष्ट आणि संघर्ष यातूनच त्यांचं आजचं व्यक्तिमत्त्व उभं राहिलं आहे. त्यांचा व्यक्तिसंग्रहही अफाट आहे. तीच त्यांची मोठी ताकदही आहे.
‘नाटक’ हा शब्दच त्यांच्या कोशात नाही. जे करायचं ते मनापासून. आत्यंतिक तळमळीनं. एक प्रसंग मला आठवतो. मी स्वत: त्याला साक्षीदार आहे. शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी पदयात्रा काढली होती. त्यांचा पाय असाही सतत फिरतीवर असतो. त्यात पदयात्रा. चालून चालून त्यांचे पाय सुजले होते, कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही आता चालू नका; पण त्यांनी ऐकलं नाही. त्या सुजलेल्या पायांनीच त्यांनी पदयात्रा पूर्ण केली.
राजू शेट्टी स्वबळावर ‘मोठे’ झाले. माणसं मोठी झाली की, त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न ‘प्रस्थापितां’कडून होतोच. तसा तो राजू शेट्टी यांच्याबाबतही झाला; पण ते बधले नाहीत. लढणारा हा नेता वाकणारा नाही म्हणूनच जनतेलाही त्यांचं कौतुक आहे.
- गोविंद पानसरे
(ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते)
वंचितांचा ‘एल्गार’
कोण, कुठली. कोलकात्यात राहणारी एक मुलगी; पण एका झपाटल्या ध्येयानं ती महाराष्ट्रात आली. चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात गेली आणि आपलं सर्वस्व तिथे झोकून दिलं. एक छोटासा बदलही काय परिणाम घडवून आणू शकतो, हे तिच्या उदाहरणातून शिकण्यासारखं आहे. स्त्रीशक्ती (स्त्रीमुक्ती नव्हे) ही प्रचंड मोठी ताकद आहे, हे तिनं दाखवून दिलं. ही स्त्रीशक्ती तिनं जागृत केली आणि त्यातून स्त्रीमुक्तीचा मार्ग आपोआप तयार झाला. ज्यांना आजपर्यंत कुठलाही ‘आवाज’ नव्हता अशा अक्षरश: ‘फाटक्या’, अस्तित्वहीन महिलांना तिनं एकत्र केलं आणि ‘श्रमिकांचा एल्गार’ घडवून आणला. विधानसभेवर तिनं आणलेला मोर्चा अनेकांच्या स्मरणात असेल. तिच्याच प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी समिती झाली. आजही ती कार्यरत आहे.
पारोमिताचा एक गुण मला अत्यंत आवडतो, तो म्हणजे तिची वृत्ती. तिची वृत्ती झाशीच्या राणीसारखी आहे. कितीही अडचणी येऊ देत, संकटांनी कितीही तयारीनिशी चालून येऊ देत, त्याला तोंड देत ती खंबीरपणे ‘उभी’ राहते. अगदी प्राणांची बाजी लावण्याची वेळ आली, तरीही ती मागे हटत नाही. दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी ज्या धडाडीनं ती लढली, त्याला सलाम करावाच लागेल; पण त्याहीपेक्षा वेठबिगारी आणि नक्षली प्रश्नावर तिनं पुकारलेला एल्गार चिरकाल आपल्या स्मरणात राहील. अनेक निरपराध नागरिकांवर बसलेला ‘नक्षलवादी’ हा शिक्का पुसून काढण्याच्या प्रयत्नात तिला स्वत:लाही ‘नक्षलवादी’ ठरवलं गेलं; पण ही जिद्दी मुलगी ना त्यामुळे बिचकली, ना मागे फिरली! वंचितांची लढाई लढायची तर ती त्यांच्यात राहूनच लढली पाहिजे, हे फार लवकर तिला कळलं. त्यामुळेच तिनं आपलं ‘स्थान’ बदललं शोधलं आणि निर्माणही केलं.
- चंद्रशेखर धर्माधिकारी (नवृत्त न्यायमूर्ती)
प्रेरणा आणि परीस
केवळ मोठी स्वप्नं पाहाणाराच नव्हे, तर तसा विचार करणारा, नवनवी आव्हानं स्वीकारणारा आणि ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिवापाड धडपड करणारा एक सच्चा माणूस असंच हणमंत गायकवाड यांचं वर्णन करावं लागेल. ‘सर्वसामान्य’ आणि सामान्यांसारखा विचार करणं या माणसाला बहुधा जमतच नसावं. म्हणूनच अक्षरश: शून्यातून तो विश्व निर्माण करू शकला.
जिथे अक्षरश: काहीच नसतं तिथेही या माणसाला ‘मोठी संधी’ दिसते आणि हा माणूस कामाला लागतो. आत्मविश्वास हा त्यांचा सर्वांत मोठा गुण आहेच; पण अशा संधी कवेत घेताना त्यांचा आत्मविश्वास आणखी फुलारून येतो. विशेष म्हणजे ही संधी त्यांना स्वत:साठी नको असते. जे नेहमीच उपेक्षित राहिलेले आहेत, आत्यंतिक गरजू आहेत त्यांच्यासाठीच संधीचा हा शोध असतो. टाटा मोटर्समध्ये इंजिनिअर म्हणून काम करतानाही त्यांना सतत तोच ध्यास असायचा. ‘भारत विकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी ‘हाऊसकीपिंग’ सेवेची सुरुवात केली त्यालाही हाच सामाजिक वसा आणि वारसा आहे. हजारो बेरोजगार हातांना त्यांनी नुसतं कामच दिलं नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांचीही आप्तांप्रमाणे काळजी घेतली, घेतात. त्यांचं संघटन आणि संपर्ककौशल्य वादातीत आहे. जमशेदपूरला काम सुरू करतानाही त्यांना अनेकांनी संभाव्य धोक्यांची कल्पना दिली होती; पण सारीच आव्हानं त्यांनी नुसती पेललीच नाहीत, तर त्यात ते यशस्वीही झाले.
त्यांचा हा प्रवास सोपा कधीच नव्हता. त्यात अनंत अडथळे आले. राजकारण्यांनीही पायात पाय घालायचा प्रयत्न केला; पण त्यातही त्यांना संधीच दिसली. आव्हानं स्वीकारणं, त्यांना आव्हान देणं आणि त्यांच्याशी झगडून त्यांना कवेत घेणं, त्यांना माणसाळावणं आणि मग इतरांच्या ती हवाली करणं हीच त्याची आजवरची वाटचाल राहिली आहे. एक वेगळी वाट चोखाळणारा आणि त्या वाटेवरची क्षितिजं कवेत घेत जाणारा आमचा हा सहकारी आजही अनेकांसाठी प्रेरणा आणि ‘परीस’ आहे.
- सतीश बोरवणकर,
सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट, टाटा मोटर्स
मातीचा आशीर्वाद
मातीचा आशीर्वाद असलेला शिल्पकार या शब्दात बी. आर. तथा आप्पासाहेब खेडकर यांचे वर्णन करता येईल. आप्पासाहेब गेली ७९ वर्षं शिल्पकलेशी संसार करीत आहेत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांची शिल्पकलेशी रुजवात झाली. फक्त दुसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झालेले असले तरी त्यांचे वाचन, चिंतन, जिद्द, कष्ट अपार आहेत.
२0 डिसेंबर २000 ला त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तरीही गेल्या ११ वर्षांत त्यांनी केवळ डाव्या हाताच्या मदतीने शिवछत्रपतींचे ११ पुतळे तयार केले. शिवछत्रपतींचे २७ पुतळे एकाच कलाकाराने तयार करण्याचा विक्रम आप्पासाहेबांनी केला आहे. सातार्यात पवई नाक्यावर बसविलेला पुतळा १९६१ मध्ये त्यांनी तयार केला. तो तयार झाल्यानंतर दत्ताे वामन पोतदार यांच्यासह अनेक इतिहास अभ्यासकांनी तो पाहिला; परंतु याच काळात पानशेत धरण फुटल्याने पुतळा वाहून गेला. आप्पासाहेबांनी जिद्दीने तो पुन्हा तयार केला. शिवाजी विद्यापीठातील साडेअठरा फुटी पुतळा आप्पासाहेबांनी एकट्याने तयार केला. फक्त माती मळून देणारे सहकारी होते. मुखवटा बनविण्याची कला त्यांनी ‘मुगलेआझम’च्या काळात आत्मसात केली. के. आसिफ यांनी त्यांना बोलावले. ‘प्यार किया तो डरना क्या’ हे सुप्रसिद्ध गाणे मधुबालावर चित्रित झाले आहे; परंतु प्रत्यक्षात ते नृत्य मधुबालाने केलेले नाही. मधुबालाचा रबरी मुखवटा आप्पासाहेबांनी तयार केला आणि तो लक्ष्मीनारायण नावाच्या नर्तकाला बसविला. १९५२ ते ६0 या काळातील मुगले आझमच्या आठवणींचा खजिना आप्पासाहेबांकडे आहे. या प्रदीर्घ कलाजीवनाचा राष्ट्रीय स्तरावर कोणताही गौरव झालेला नसताना माती आणि पंचधातूंच्या संगतीत या कलावंताची वयाच्या ८६व्या वर्षीही साधना सुरूअसते.
- डी. एस. खटावकर
(ज्येष्ठ चित्रकार)
दोस्त
समुद्र, समुद्रकिनारा हा किशोरचा अत्यंत विक पॉइंट. आईबाबतही तो अतिशय हळवा आहे. त्याचा आणखी एक विक पॉइंट म्हणजे त्याचे मित्र. त्यांच्यासाठी अगदी जिवाला जीव देण्याचीही त्याची तयारी असते. त्याच्या कल्पनांना वेळकाळाच्या र्मयादा नसतात. मित्रांना कधी अगदी मध्यरात्री त्याचा फोन जाईल किंवा भल्या पहाटे. ‘उठलास ना, मग आता बॅग घेऊन तासाभरात निघ. बाकीचं नंतर सांगतो.’
समुद्रकिनार्यांवरच्या गेस्ट हाउसमध्ये अशा अनेक रात्री मग त्याने मित्रांच्या साथीने चिरंजीव केल्या आहेत. कवितांची मैफल, गप्पा, चर्चा, हास्यविनोद. यात तास, दिवस, रात्री कशा संपतात ते कळतच नाही.
बॅग भरून घेऊन आलेल्या डीव्हीडींच्या त्याच्या पोतडीतून देश-विदेशातले उत्तमोत्तम चित्रपटही बाहेर पडतात. ‘नवं’ जे काही असेल ते इतरांना सांगायला, इतरांकडून शेअर करायला त्याला प्रचंड आवडतं. त्यासाठीही कोणतीही वेळ काळ त्याला बंधनं घालू शकत नाहीत. स्वत:ची नवी कविता जेवढय़ा उत्सुकतेनं तो ऐकवतो, त्यापेक्षा अधिक उत्सुकतेनं इतरांची चांगली कविता, पुस्तक, कांदबरी तो ऐकवतो. त्याचं वाचन अफाट आहे. तेवढंच मनन आणि चिंतनही. तो भटक्या प्रवासी तर आहेच; पण तो उत्तम खवय्या आणि स्वयंपाकीही आहे. मित्रांबरोबर घराबाहेर पडला की ‘चाकोरी’तून तो स्वत:ला पूर्णपणे डिस्कनेक्ट करतो. दोन-तीन दिवस अगदी मोबाईलही पूर्णपणे बंद ! साहित्य, चित्रपट, संगीत आणि मित्रांच्या सोबतीत स्वत: हरवून जायचं आणि इतरांनाही तोच अनुभव द्यायचा. मनावरची, अंगावरची सगळी ‘जळमटं’ झटकायची, नव्या ऊर्जेनं ताजंतवानं व्हायचं, कैफात राहायचं आणि कैफात जगायचं.
खेड्यात भटकायचं, अगदी स्वत:च बाजारात जाऊन भलीमोठी भाजी खरेदी करायची, स्वत:च्याच हातानं चवदार स्वयंपाक करायचा, चवीनं तो खायचा आणि खिलवायचाही.
त्याच्या माणूसपणाची आणि मैत्रीची ही चव उतरणारी नसतेच.
- प्रकाश होळकर
(कवी, गीतकार)
एक नया मकाम
‘मालेगाव का सुपरमॅन’च्या निर्मितीविषयी मी पहिल्यांदा कुठल्या तरी चॅनलवर एक इंण्टरव्ह्यू पाहिला. अजब वाटलं मला ते सारं. तोपर्यंत मला माहितीही नव्हतं की, मालेगाव नक्की आहे कुठे.!
मी उठलो आणि सरळ मालेगावात गेलो. तिथं नासीर शेखला कोण ओळखत नव्हतं.? - सगळं गावच सिनेमावेडं. नासीर पहिल्यांदा भेटला भररस्त्यात, कुठून तरी मोटारसायकलवर येत होता. घामानं ओला गच्च. पण सिनेमा म्हणताच, त्याला अशी काही तरतरी आली की भर उन्हात तो भरभरून बोलू लागला. त्याक्षणी वाटलं की, ‘इस बंदे का सिनेमा के लिए पॅशन अनबिलिव्हेबल है.!’
सिनेमाच्या वेडापायी घरदार, असेल-नसेल ते किडूकमिडूक सगळं गहाण टाकायची त्याची तयारी होती, काही गोष्टी तर त्यानं आधीच विकल्या होत्या. त्याच्या डोक्यात कायम ‘सिनेमा’ भरलेला. ‘पिक्चर’ या शब्दापलीकडे त्याला दुसरं काहीच सुचत नाही, दिसतही नाही. तासन्तास तो सिनेमाविषयी बोलू शकतो. बोलतो. त्याचे सिनेमे हे वरकरणी बॉलिवूड सिनेमेचे रिमेक वाटत असले तरी ते तसे नाहीत, अत्यंत अस्सल आणि नवं काम आहे त्याचं. त्या सिनेमाच्या थिम, त्यातली विनोदी गुंफण, त्यातले संवाद हे सगळं अत्यंत कल्पक आणि ओरिजनल आहे.! ‘ जिसकी कभी कोई मंझिल ही नहीं थी, उस सफर पे निकल पडा ये बंदा. और देखो उसका खुदका एक मकाम है.!
मी त्याचा ‘सुपरमॅन’ विकत घेतला आणि आता ‘मालेगाव का स्पायडरमॅन’ या नव्या सिनेमाचीही निर्मितीही मी करतोय. ‘सुपरमॅन’ लवरकच देशभरातल्या काही निवडक मल्टिप्लेक्समधे प्रदर्शित होईल. मी खरंच सांगतो, नासीर आणि त्याचा हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या भविष्यात स्वत:ची एक खास जागा तयार करतील, हे नक्की !
- सुनील बोरा
(हिंदी चित्रपट निर्माते)
जिद्दीची हद्द
वीरधवलचं सर्वांत मोठं बलस्थान म्हणजे त्याची जिद्द. त्याचबरोबर शिकण्याची आणि जिंकण्याची त्याची ईर्षा. त्याच्या बाजूने जमेच्या आणखी दोन बाजू आहेत त्या म्हणजे त्याची उंची आणि त्याचं वय.
त्याच्या डोक्यात रात्रंदिवस विचार असतो तो फक्त जलतरणाचाच. महाराष्ट्रात आजही जलतरणात वर्चस्व आहे ते मुंबई, पुण्याचं; पण कोल्हापूरसारख्या निमशहरी ठिकाणी असतानाही त्यानं आपली छाप पाडली; पण त्याला आणखी पुढे झेप घ्यायची होती. त्याच ओढीपोटी तो बंगळूरूला आला.
२00५ पासून मी वीरधवलला कोचिंग करतोय. अतिव आत्मविश्वास, पराकोटीची मेहनत घेण्याची तयारी आणि स्वत:वरच विजय मिळविण्याची पराकाष्ठा. या अत्यंत दुर्मिळ गोष्टी त्याच्याकडे आहेत. जगातल्या कुठल्याही नामवंत जलतरणपटूकडे असणारी गुणवत्ता त्याच्याहीकडे आहे. कुठल्याच बाबतीत तो कमी नाही. हव्यात फक्त सुविधा आणि अनुभव. तोच त्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.
कुठलीही गोष्ट तो इतक्या झटकन आत्मसात करतो की, आश्चर्य वाटावं. त्यात परिपूर्णता आणणं हाच त्याचा ध्यास असतो. त्यासाठी तासन्तास तो सराव करतो. त्याची हीच जिद्द, लगान त्याला ऑलिम्पिकमध्येही निश्चितच पदक मिळवून देईल. भारताचं तर तो आशास्थान आहेच; पण जगातल्याही अनेक जलतरणपटूंचं त्याच्या प्रवासाकडे लक्ष आहे. यातूनच त्याच्यातली गुणवत्ता अधोरेखित होते.
- निहार अमीन
(आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरण प्रशिक्षक)
No comments:
Post a Comment