श्री. व.पु. काळे यांचे कथाकथन न ऐकलेला, "वपुर्झा" न वाचलेला साहित्यप्रेमी विरळाच ! आज आपल्यासाठी "वपुर्झा " मधील काही उतारे देत आहे. आपल्या मनातील विविध विषयांवरील विचार जसे आहेत तसे, उगाच कसलाही मुलामा न देता व्यक्त केले आहेत वपुर्झा मध्ये. हा थेटपणा, हा खरेपणा, हा सरळपणा हेच वपुर्झाचे वेगळेपण ! आपले विचार व्यक्त करण्यासाठी आजकाल आपण "ब्लॉग " वापरतो पण व.पु.नी "वपुर्झा" द्वारे फार पूर्वीच ही कल्पना हाताळली होती असे वाटते मला, फक्त त्यावेळी इंटरनेट नव्हते म्हणून !!!
------------------------------------------------------------------------------------------------
"माणसाला काही न काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वत:ला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे " हरवणं-सापडणं " प्रत्येकाचं निराळं असतं. पती-पत्नीचं एकंच एक मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पती-पत्नीच्या ह्या हरवण्याच्या-सापडण्याच्या जागा एकाच निघाल्या तर ते सुख-दुखा:चे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्नं वेगवेगळी असतील, तर प्रकृतीधर्मानुसार ते स्वाभाविक आहे, पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल, त्यांना संसारसुखाचं मर्म सापडलं. ज्यांना हे असं हरवता येत नाही, ते रिकाम्या वेळेचे बळी ठरतात. रिकामा वेळ सैतानाचाच."
------------------------------------------------------------------------------------------------
अक्षता ह्या शब्दातलं प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे.
अ = अर्पणभाव
क्ष = क्षमाशीलता
ता = तारतम्य
हे तीन गुण दोघांजवळ हवेत.
प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या उतरवाव्यात. एकमेकांच्या वृत्तीचा खरा मागोवा घ्यावा. सप्तकातले किती सूर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासावं. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालू शकणार आहोत त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली कि साप तिकडे वळूनही पाहत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो, त्याचं संशोधनचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्याला अर्पणभाव म्हणतात.
स्वत:तल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे, दोष समजले आहेत, कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तीदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती म्हणजे क्षमाशीलता. तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाकवायला लावायचं, स्थळ, काल, स्थिती यांचं भान म्हणजे तारतम्य. "
------------------------------------------------------------------------------------------------
" आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुखा:चे कढ आणि आवर घातलेले आवेग-हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला. "
No comments:
Post a Comment