धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं. सगळेजण म्हणतात भजी आणि चहा पाहिजे. लोक म्हणतात चांगली गाणी लावा. मग गाणी लावली की पब्लिक पाउस आहे म्हणून शांत गाणी लावा म्हणते. शांत गाणी बरेचदा उदास असतात. गझल फिजल. गझली हा प्रकारच उध्वस्त. संस्कृतात सगळीकडे सज्जन, दुर्जन , चंदन, गुलाब तर उर्दूत सगळ्यांचे प्रेमभंग आणि दारु. पावसात, चिकचिकीत कुठे जायचा कंटाळा येतो म्हणून नखरे सुचतात असले.
प्रेम, देशभक्ती आणि थेअरी ऑफ रेलेटिव्हिटी हे पूर्णपणे कळाले आहेत का कुणाला? मागचे लिहिले तेवढे सेंटी वाक्य मी लिहीले आहे याच्यावर विश्वासच बसत नाहिये. प्रेम म्हणजे किल-बिल मधले बिल आणि बेट्रिक्सचे प्रेम, तेच खरे. देशभक्ती म्हणजे, मागच्याच्या मागच्या वाक्यात देशभक्ती शब्द टाकायलाच नको होता, उदाहरण आठवत नाही लगेच.
लाईफमधे फंडे क्लिअर असणे फार महत्वाचे आहे. फंडे योग्य असोत किंवा अयोग्य, ते क्लिअर असणे महत्वाचे आहे. आपण बरोबर आहोत का चूक ते माहित असणेपण महत्वाचे आहे. बिलचे फंडे क्लिअर आहेत एकदम. तो म्हणतो - "बॅट्मॅन हा मूळात ब्रुस वेन आहे, स्पायडरमॅन हा मूळात पीटर पार्कर आहे. पार्कर, वेन यांना वेश चढवून स्पायडरमॅन, बॅटमॅन बनायला लागते. पण सुपरमॅन हा मूळातच सुपरमॅन आहे, त्याला वेश बदलून क्लॉर्क केंट बनायला लागते. हा महत्वाचा फरक आहे. तशी तू मूळातच नैसर्गिक असॅसीन आहेस..." आपल्या छोट्याश्या पोरीलापण मृत्यू समजावून ठेवला आहे बिलने. तडफडणारा मासा दाखवून.
कंपनीमधे मलिक म्हणतो, "मैं चंदू नही हूं", श्रीनिवासन नंतर म्हणतो, "मैं भी चंदू नही हूं".
हे सगळे असंबध्द आहे पण फंडे असे क्लिअर पाहिजेत माणसाचे.
मातीचा वास वगैरेपण येतो पाउस पडल्यावर. त्याचा परफ्यूम काढायला पाहिजे, लय पैसा मिळेल. पाउस पडतोय बेक्कार, एक जोडी गाडीवरून जाताना दाखवायची - टेबल लॅंडटाईप कुठेतरी. स्म्म्म्म करुन श्वास घेवून, मातीचा वास मला आवडतो म्हणणार हिरॉईन. मग हीरो आयलव्हयू म्हणणार, समोर लगेच आपला परफ्यूम. मुलगी, जिंगल आणि परफ्यूमचा आकार योग्य असेल तर चालेल परफ्यूम. असेलच असा एखादा परफ्यूम बाजारात.
पाणी बिळात भरते पावसाळ्यात म्हणून साप बाहेर येउन फिरत बसायचे चिपळूणला. इतकी वर्ष पाउस पडतोय, इतकी वर्षे बिळे बनतायत, सापांनी काहीतरी विचार केला असेल का? का अजुनपण चारपाच साप बुडुन मरतात?
पुस्तकांचा वासपण आवडतो लोकांना. नवीन पुस्तकांचा चांगला येतो. किंडल ई बूक रिडर घेतला तर तो वास येणार नाही. किंडलच्या प्लॅस्टिकचा वास आवडेल की नंतर. रेनकोट आणि छत्र्या पण येतात लगेच. काय अर्थ आहे वर्षानुवर्षे छत्र्या, रेनकोट वापरण्याला?
स्व-रुप पहा विश्वरुप नको, असा एक धडा होता विनोबांचा. त्यात एक राजपुत्र आणि राजा उन्हातून जात असतात. राजपुत्र म्हणतो चटके बसत आहेत पायाला, चामडे अंथरुया सगळ्या राज्यात जमिनीवर. राजा म्हणतो वेड्या त्यापेक्षा तु तुझ्या पायात चपला घाल. स्व-रुप पहा.
राजपुत्र जे म्हणाला तेच जर एडिसन, आईनस्टाईन किंवा गांधीजी म्हणाले असते तर.
त्याच धड्यात होते का हे?
पावसाळ्यात सर्दी होते लगेच लोकांना. सर्दीचे एक आहे, कुठल्याही ऋतुमधे पन्नास टक्के लोकांना गाठतेच ती. इतके वर्षे सर्दी होत आहे माणसाला. कुत्रीपण शिंकतात कधी कधी. इतकी प्रगती झाली, एक साधी गोळी नसावी की जी घेतल्या घेतल्या घसा खवखवायचा बंद होईल, सर्दी जाईल पाचेक मिनीटांत. काहीपण घ्या ३-४ दिवस असतेच.
पाउस बरा असतो, पिकांना पाणी , पोरांना होड्या etc. पावसाला लाच द्या. बेईमानी का धंदापण ईमानदारीत नाही. पैसा झाला खोटा !
*
हे लिहायची काही गरज नव्हती खरे तर. नाव योग्य आहे ब्लॉगचे.
No comments:
Post a Comment