Monday, December 1, 2014

वाढदिवशी आनंदीच रहायला हवं हा नियम असूनही मोठय़ानं भोकाड पसरावं असं का वाटतंय मला.?


वाढदिवशी आनंदीच रहायला हवं हा नियम असूनही मोठय़ानं भोकाड पसरावं असं का वाटतंय मला.? रात्री बाराच्या ठोक्याला मेसेजेस.संध्याकाळी भेटणारच सगळे. ते माझ्यासाठी ब्लॅकफॉरेस्ट आणणार, मेहुल एक पार्कर देईल. सानिका हॅपी बर्थडे लिहिलेला मग देईल. चुकून राहून गेलेलं प्राईस टॅग सगळ्यांसमोर काढत निमिष रिस्ट वॉच देईन, वर्षा एक डेअरी मिल्क देईल. मुलींवाला एक लूक थ्रो करत म्हणेल ‘किती महाग गिफ्ट देतोय त्यापेक्षा किती मनापासून देतोय, दॅट मॅटर्स.’मग मॅकडी मधे हॅपी बर्थडे टू यू.हे सगळं असंच होतं!पण हे मला का माहितीये.?हे तर सरप्राईज आहे.मी ‘सरप्राईज’ने चकीत व्हायलाच हवं. इट्स माय बर्थ डे टुडे. मी खूप एक्साईटेड नसलो तरी ‘अरे माझ्या लक्षातच राहत नाही माझाच वाढदिवस’ असं माझं काही नाहीये. माझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस आणि तुषार, मह्या, अवि, सानिका, मेहुल, वर्षा, स्वाती, निमिष, तन्वीर, फैजल याही सगळ्यांच्या लक्षात आहे. फेसबुक यायच्या आधीपासून. म्हणजे मी विसरलो नाहीये, इतकंच. आणि तेही विसरले नाहीयेत. रात्री बाराच्या ठोक्याला यातल्या तिघींचे एकाच वेळी मेसेजस आले मला..‘सो, आय विश यू फस्ट राईट?’ मी ‘येस ऑफकोर्स.थॅँक्स’ असा रिप्लाय केला, तिघींनाही. आणि आता दुपारी बारालाही माझा व्हाट्सअपचा मेसेंजर दर पंधरा-वीस मिनिटांनी खणखणतोय. पण तरीही तो बंद करून ठेवावासा नाही वाटत. मग चार-पाच फोन आणि दोन-तीन व्हच्यरुअल ग्रीटिंग काडर्स. आता उठायला हवंय. संध्याकाळी भेटणार आहोत सगळे. ते माझ्यासाठी ब्लॅकफॉरेस्ट आणणार मॉन्जिनिसमधून. मेहुल एक पार्कर देईल. सानिका हॅपी बर्थडे लिहिलेला मग देईल. निमिष रिस्ट वॉच देईन, चुकून राहून गेलेलं प्राईस टॅग सगळ्यांसमोर काढत. वर्षा एक डेअरी मिल्क देईल. आणि निमिषकडे एक मुलींवाला लूक थ्रो करत म्हणेल ‘किती महाग गिफ्ट देतोय त्यापेक्षा किती मनापासून देतोय, दॅट मॅटर्स.’ मग मॅकडीमध्ये हॅपी बर्थडे टू यू ची ट्यून वाजेल साडेसात सेकंद आणि एक अख्खा मिनिट मी केकने माखलेला स्वत:चा चेहरा उगाच वॉशरूमच्या आरशात न्याहाळत बसेन. पण मला आता यातलं काहीच माहीत असायला नको, म्हणजे ते मला एक प्लिझण्ट सरप्राईज असेल. असावं. हे सारं असंच होतं, होणार हे माहीत असूनही मी ‘सरप्राईज’ने खूश व्हायला पाहिजे. खोलीचं दार उघडून मी बाहेर येतो. दुधाचं भांडं उघडंच राहून गेलंय. राकेशला आज मॉर्निंग शिफ्ट. त्यामुळे तो सातलाच बाहेर पडला असणार. पार्थ आजही केर बाहेर ठेवायला विसरलाय. ‘सॉरी भाई, वॉज इन हरी, हॅपी बर्थडे, एन्जॉय यूवर डे. ओट्यावर खरडून ठेवलेलं खडूने मध्यभागी. जीव खाऊन तीनदा खसाखसा पुसून काढला ओटा तरी पुसट पांढर्या रेषा दिसत राहिल्याच. अंथरूणावर अस्ताव्यस्त पसरलेली सिगरेटची थोटकी तशीच राहू देत.अनुषा भयंकर कातावते हे पाहून. ‘व्हाय यू गाईज हॅव टू बी सो प्राऊड पिग्ज?’ पण आता तीसुद्धा बंगळुरुलाय. भल्या पहाटे आठला तिचा फोन आला. ‘हाय बेबी, हॅपी बर्थडे! लव्ह यू.मुआऽऽ.’ हेच दोन-तीनदा क्रम बदलून म्हटलं तिने आणि फोन ठेवून दिला. नवाकोरा जॉब आहे त्यामुळे जरा एक्साईटेड असेल असं स्वत:ला समजावत मी पाकिटातली शेवटची सिगरेट शिलगावतोय. खिडकीतून एक छोटासा कवडसा आत शिरून बसलाय. त्या कवडशात मला माझा इवला धूर खोलीभर उंच आणि मोठ्ठा वाटतोय. त्याच्याकडे एकटक वगैरे बघत बसायचं मी फक्त! चिडचिड नाही करायची आजच्या दिवशी असं मी दरवर्षी ठरवतो. बट आय फिल इरिटेड यार! कालचा दिवसच आजही आहे आणि तोच उद्याही असणारे. तरीही याच दिवशी फेसबुकवर नको जायला, फोन नको उचलायला, खोलीतून बाहेर नको यायला, अंघोळ नको करायला, संध्याकाळी बाहेर नको जायला असं सगळं एकदम, एकाच वेळी खूप तीव्रतेने का वाटत असतं? अशाच वेळी नेमकी पाकिटात एकच सिगरेट का शिल्लक राहते? आणि मग एक तरी का राहते? जुलैमध्ये एकही सुट्टी का नसते? तरीही जुलैमध्येच का येतो माझा बर्थडे? दिवाळीत, ख्रिसमसला, गणपतीत, आंब्याच्या सीझनमध्ये, २९ फेब्रुवारीला असा का येत नाही? मला आई कधीच चॉकलेटस् का द्यायची नाही वाटायला शाळेत? ‘टीचर इट्स माय बर्थडे टुडे’ असं सांगूनही टीचर बाहेर उभं का करायच्या? ‘तू ओरडत जा ना त्यांना’ असं आईला सांगायचं ठरवून घरी येताच बेल वाजवल्यावर आजही आमच्या मावशीच का दार उघडायच्या? आजसुद्धा त्या माझ्यासमोर बोर्नव्हिटाचाच मग आदळायच्या ‘लवकर लवकर पी’ असं खेकसतच. आणि मुख्य म्हणजे आठव्या वाढदिवसाला पहिल्यांदा पडलेले हे प्रश्न पंचविसाव्या वाढदिवसापर्यंत छळत आलेत सतत चढत्या भाजणीत? पार्थने एव्हाना पार्कर घेतला असेल. ब्लॅकफॉरेस्टवर माझं नाव पेस्ट्रीफाय होत असेल. माझ्यासाठी म्हणून सगळे सरप्राईज प्लॅन करताहेत. पण अशा कशानेही मला सरप्राईज होताच येणार नाहीये याचा आज मला माझ्या वाढदिवशी चार वाजून छप्पन्नाव्या मिनिटाला अतोनात त्रास होतोय. निदान हे बघायला तरी कोणीतरी असायला हवं होतं इथे. हे सगळं असं घडायलाच नको होतं.... पण घडतं असंच, माहित असलेल्या सरप्राईजसारखं.ते सरप्राईज काय हे माहिती आहे, तरीही या ‘आय विश’ खेळाचा मोह आवरता येत नाहीये.

No comments:

Post a Comment